करूया संरक्षण 'ओझोनचे
================
*करूया संरक्षण 'ओझोनचे '*
================
*आपण काय करू शकतो*.
1. सामान्य माणसे सुद्धा ओझोन थराच्या संरक्षणासाठी मदत करू शकतात. त्यासाठी खाजगी वाहना ऐवजी शक्य तेव्हा सार्वजनिक वाहने,सायकल वापरा ,पायी चाला.
2. घरात साफसफाईसाठी विष विरहित व नैसर्गिक पदार्थ वापरायचा आग्रह धरा.
3. शक्यतो स्थानिक भागात विकणारा भाजीपाला, फळे खा.
4. घरातले देखभाल दुरुस्ती वेळोवेळी केली जाते आहे का, हे आई- बाबांच्या लक्षात आणून द्या.
*ओझोन वायू नसता तर?*
पृथ्वीच्या वातावरणाच्या खालच्या थरात- म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण १२ ते ३५ किलोमीटर उंचीवर ओझोन वायू प्रामुख्याने आढळतो. ओझोनच्या रेणूमध्ये प्राणवायूचे ३ अणू सामावलेले असतात. ओझोनच्या पातळ थराला 'पृथ्वीचे संरक्षक कवच' म्हणतात. सूर्याच्या किरणांमध्ये अतिनील किरणे असतात. ओझोनच्या थरात जवळपास ९७ ते ९९ टक्के अतिनील किरणे शोषली जातात. ओझोनचा थर अस्तित्वातच नसता, तर सर्व अतिनील किरणे सूर्यप्रकाशासह थेट पृथ्वीवर पोहोचली असती. या किरणांमुळे त्वचेचा कर्करोग, मोतीबिंदू होण्याचे प्रमाण वाढले असते. रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असती. झाडे, वने, पिके, उपकारक सूक्ष्मजीव यांच्या जीवनचक्रावर मोठा परिणाम झाला असता. नैसर्गिक परिसंस्था आणि अन्नसाखळीला धक्का लागला असता.
💁♂️ *'ओझोन'ला धोका कशाचा? :*
ओझोनच्या थराची जितक्या वेगाने निर्मिती होते, त्यापेक्षा अधिक वेगाने त्याची हानी होऊ शकते. क्लोरोफ्लुरो कार्बन, हायड्रोक्लोरोफ्लुरो कार्बन, कार्बन टेट्राक्लोराइड, मेथिल क्लोरोफॉर्म, हेलॉन, मेथिल ब्रोमाइड, हायड्रो ब्रोमोफ्लुरो कार्बन हे घटक ओझोन रेणूंची हानी करतात. यांपैकी 'क्लोरोफ्लुरो कार्बन' हा घटक ओझोनला सर्वांत जास्त हानिकारक आहे. एसी आणि फ्रिजसारख्या उपकरणांमधून, तसेच इतर विविध मानवनिर्मित कारणांमुळे ते वातावरणात मिसळतात.
💁♂️ *ओझोन बचावाचे महत्त्वाचे टप्पे*
*1.१९८५*
ओझोन संरक्षणासाठी 'व्हिएन्ना परिषद' आयोजित करण्यात आली. देशांनी एकमेकांना सहकार्य करूनच ओझोनचे संरक्षण करावे लागेल, असे त्यात ठरले.
*2.१९८७* ओझोनच्या थराला धोका निर्माण करणाऱ्या क्लोरोफ्लुरो कार्बन आणि हायड्रोक्लोरोफ्लुरो कार्बन या मानवनिर्मित घटकांवर नियंत्रण आणायचे ठरले. त्यासाठी 'मॉन्ट्रियल प्रोटोकॉल' या नावाने काही नियम आणि टाइमटेबल तयार करण्यात आले.
*3.१९९४* ज्या दिवशी देशांनी 'मॉन्ट्रियल प्रोटोकॉल'वर स्वाक्षऱ्या केल्या, तो दिवस- १६ सप्टेंबर 'ओझोन संरक्षण दिन' म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले.
*4.२००९* 'व्हिएन्ना परिषद' आणि 'मॉन्ट्रियल प्रोटोकॉल'चे नियम संपूर्ण जगाने मान्य केले.
*5.२०१६*
'किगाली अमेंडमेंट' या नियमांद्वारे आधीच्या प्रयत्नांना पाठिंबा मिळाला.
Comments
Post a Comment