तुमच्याही मुलांना सतत राग येतो का? घरोघरी मुलं इतकी चिडकी का होत आहेत?
*तुमच्याही मुलांना सतत राग येतो का? घरोघरी मुलं इतकी चिडकी का होत आहेत?*
सतत आदळ-आपट, नाकावर राग, हट्टीपणा आणि भयंकर संताप, मुलांच्या वागण्यात हे येतं कुठून?
✒️ *ठळक मुद्दे*
राग येण्याची कारणं समजून घेतली आणि त्यावर योग्य उपाययोजना केली तर मुलांचा राग नियंत्रणात आणता येईल.
*डॉ. श्रुती पानसे(मेंदू विकास अभ्यास तज्ज्ञ आणि समुपदेशक)*
मोठ्या माणसांनी रागवायचं आणि मुलांनी ते ऐकायचं, हेच खरं तर आपल्या समाजाचं वळण; पण आता हे चित्र उलटं दिसायला लागलं आहे.काही घरांमध्ये आईबाबा मुलांच्या सर्वच गोष्टी हातात घेतात. मुलं लहान असताना, साधारण चौथी-पाचवीत जाईपर्यंत मुलांचे निर्णय आई-बाबाच घेत असतात. अनेक घरांत हे पुढेही सुरू राहतं आणि आई-बाबा आणि मुलं यांच्यात एक संघर्ष निर्माण होतो. ते मुलांचा राग-संताप यातून बाहेर पडण्याचं प्रमाण सध्या वाढलेलं दिसतं.प्रश्न असा आहे की, काही घरांमध्ये असं वातावरण अजिबातच नसतं. आई- बाबा मुलांच्या मनाची खूप काळजी घेतात. त्यांना वाईट वाटेल असं वागत नाही. यासाठी शाळेची निवडसुद्धा फार काळजीपूर्वक करतात. मुलांवर ओझं येऊ नये यासाठी होम लर्निंगचा पर्यायही स्वीकारतात; पण कधीकधी एवढं करूनही मुलं अगदी लहानपणापासून चिडचिड करतात. थोडा राग येणं हे समजून घेता येतं; पण पाय आपटणं, खोलीचं दार आपटून लावणं, खोलीतच बसून राहणं, जेवणावर राग काढणं, वस्तू फेकणं, हेही घडतं. ‘टीनएज’च्या वयात आधीच्या सर्व गोष्टींसह धारदार शब्दांनी आई-बाबा; आजी-आजोबा यांचा जाणीवपूर्वक अपमान करणं, त्यांच्या चुकांचं भांडवल करून भांडण करणं, आपल्या घराची दुसऱ्या घरांशी तुलना करून कमतरतांची सतत जाणीव करून देणं, हे घडताना दिसतं. काही घरांमध्ये तर मुलांचं पालकांच्या अंगावर धावून जाणं, वस्तू त्यांच्या दिशेने फेकणं, स्वत: घरातून गायब होणं, ते अगदी टोक गाठत रागाच्या भरात आत्महत्या करणं इथपर्यंत हा राग पोहोचलेला दिसतो.हे असं का होतं?
१. *घरातलं वातावरण शांत हवं.* अनेकदा आपल्या घरातच माणसांना उगाचच एकमेकांवर डाफरण्याची सवय असते. बाबा आईवर, आई बाबांवर, सगळे मिळून मुलांवर, हे वातावरण बघतच मुलं मोठी होतात. त्यामुळे ओरडून बोलणं यात काही चुकीचं आहे असं त्यांना वाटत नाही. हेच नैसर्गिक संभाषण आहे, असं वाटतं. यात दोष मुलांचा नसतो. मोठ्यांचं बघूनच ते शिकलेले असतात. घरातल्या सर्वांनी हळू आवाजात, नीट बोलायचं ठरवलं तर मुलांचीपण सवय बदलते.
2. *स्वभावाला औषध देणे.* घरातले बाकीचे सर्व नीट, शांतपणे बोलतात आणि एखादी व्यक्ती ओरडणारी असते. मुलं अशा त्या एका व्यक्तीकडे बघूनसुद्धा ओरडायला शिकतात. राग व्यक्त करायला शिकतात. ती व्यक्ती उच्चारते त्याच पद्धतीने आणि तेच शब्द बोलतात. ही मोठी व्यक्ती जेव्हा आपलं वागणं सुधारते, तेव्हा मुलांची ही सवयही आपोआप कमी होते.
3. *असुरक्षिततेची भावना* जन्मापासून पहिल्या काही वर्षांत घरातल्या माणसांचा पुरेसा सहवास मिळाला नाही, स्पर्श मिळाला नाही, तर मुलं मनाने अस्वस्थ होतात. हे अस्वस्थपण नेहमी जाणवेलच असं नाही, मुलं कायम राग-राग करतील, असं नाही. शांतच असतील; पण ही असुरक्षित करणारी भावना कुठेतरी आतमध्ये दडून राहिलेली असते. ही अस्वस्थता केव्हा तरी अचानक संतापाच्या स्वरूपात बाहेर पडते. त्या संतापामुळे घरातली माणसं मात्र काळजीत पडतात.
4. *प्रेम कमी मिळणं* विविध कारणांमुळे काही मुलांना जन्मापासून प्रेम मिळालेलं नसतं. सलग एका घरात न राहणं, आसपासची माणसं मृत्यू, आजारपण, घटस्फोट अशा कारणांमुळे बदलत राहणं, आयुष्यातली व्यक्ती अचानक निघून जाणं किंवा अचानक नव्या व्यक्तीचं आगमन होणं, ते स्वीकारता न येणं यामुळे मुलांमध्ये रागाचे विविध प्रकार बघायला मिळतात. राग, चिडचिड करत राहणे, कधीच समाधानी नसणे, इतरांशी चांगली मैत्री न करता येणं. त्यामुळे अशा मुलांना समजून घेण्याची जास्त गरज असते. अशा मुलांना रागावलं तर बऱ्याचदा त्यांची प्रतिक्रिया रडू येणं अशी असते. आत्महत्येसारखी अत्यंत टोकाची आणि विघातक पावलं ही मुलं उचलू शकतात.
5. *कार्टून फिल्म्स/ मोबाइल* गेम्स/ सीरियल्स यांचा मोठा प्रभावघरात काहीच समस्या नाहीत; पण तरीही मुलांच्या रागाचा पारा कायम चढलेलाच असतो. याला बहुतांशी कारणीभूत ठरतो तो स्क्रीन आणि त्यावर मुलं काय-काय बघत असतात, किती वेळ बघत असतात ते. गेम्समध्ये कोणाला तरी पाडणं, ढकलणं, उखडणं, मोडणं अशा प्रकारच्या कृती ठासून भरलेल्या असतात. कार्टून फिल्म्समधली चित्रविचित्र पात्रं, त्यांचे विचित्र आवाज, त्यांच्या हालचाली, एकमेकांना त्रास देणं, ओरडून बोलणं, चिडचिड करणं, याचा परिणाम आपसूकच मनावर होत असतो. या ‘चुकीच्या वागण्यात’ हळूहळू मजा वाटायला लागते. त्यात काही चुकीचे आहे, असं मुळात वाटतच नाही. हीच सवय होऊन जाते.घरात सगळी माणसं मालिका बघत असतील तर त्यातली पात्रं ज्या पद्धतीने वाईट वागतात, बोलतात, वाईट शब्दांवर जोर देऊन बोलतात, त्यातल्या अत्यंत फालतू आणि घाणेरड्या गोष्टी मुलं उचलतात. यांचा प्रयोग वारंवार घरच्या माणसांवर होऊ लागतो.
6. *हानिकारक केमिकलयुक्त* आहारसध्या मुलांच्या आहारात जंक फूडचं प्रमाण वाढलेलं आहे. यात काही हानिकारक घटक असतात, ज्याचा परिणाम भावनांवर होतो. परिणामी चिडचिड वाढते.
7. *मोबाइलचे व्यसन* मोबाइल हे व्यसन आहे, हे पक्कं लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणून आधीपासून मोबाइल द्यायचाच नाही. दिला तरी मोबाइलचं टाइमटेबल करायचं, मुलांना छंदासाठी, मैत्रीसाठी उद्युक्त करायचं.
*शांतपणे बोलणं हाच उपाय* मुलांशी शांतपणे बोलणं हेच महत्त्वाचं आहे. चुका देखील चांगल्या शब्दांची निवड करून सांगता येतात. आपल्या ताण-तणावामुळे आपण मुलांवर राग काढत असू, तर स्वत:शी चांगला संवाद साधायला हवा. राग येण्याची कारणं समजून घेतली आणि त्यावर योग्य उपाययोजना केली तर मुलांचा राग नियंत्रणात आणता येईल; मात्र त्यासाठी धीर धरण्याची आवश्यकता आहे.
Comments
Post a Comment