पद्मश्री अशा हिऱ्यांना शोधून दिले जाऊ लागलेत..
पद्मश्री अशा हिऱ्यांना शोधून दिले जाऊ लागलेत म्हणून सरकारचे विशेष अभिनंदन...... 🪷श्री. अमायी महालिंगा नाईक🪷 केपु. कर्नाटकातल्या अद्यानाडकाजवळचं एक छोटं गाव. एक माणूस तिथं सुपारी आणि नारळाच्या बागेत मजुरी करत होता. स्वतःचं ना घर ना जमीन. पण त्याचं समर्पण आणि प्रामाणिकपणा बघून त्या बागेचे मालक महाबाला भट यांनी 1978 मध्ये त्याला 2 एकर जमीन बक्षीस म्हणून दिली. जमीन एका टेकडीच्या माथ्यावर होती. पूर्ण नापीक आणि ओसाड. पाण्याचा मागमूसही नाही. आपल्यासारखा कोणी असता, तर जमिनीचा नाद सोडून दिला असता. पण त्या माणसानं ह्या जमिनीवर सुपारीच्या बागेचं स्वप्नं बघितलं; आणि सुरू झाला एक शोध - संघर्ष अंगावर घेणार्या साहसांचा, प्रश्न पडलेल्या वाटांचा, उत्तरांच्या प्रवासाचा आणि जगण्याचा... मग टेकडीच्या पायथ्याला कुटुंबासाठी झोपडी बांधायला सुरुवात केली. टेकडी सपाट करून घेतली. त्यासाठी भिंत बांधली. पाण्याचा प्रश्न होताच. विहीर खोदण्यासाठी पैसे नव्हते. मग ती स्वतःच खोदायचं ठरवलं आणि लागले कामाला. टेकडीच्या पायथ्याला असल्यानं पाणी साठवण्याच्या प्राचीन पद्धतीप्रमाणं आडवा अरुंद बोगदा खोदायला सुरुवात केली. ...